मुंबई : गौतम अदानीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसासाठी केलेलं काम नाही. अदानीसारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची? अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती प्रहार केला. आम्ही राज्याचे तुकडे होऊ देत नाही, आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तुम्ही अमित शहांची राज ठाकरांबरोबर तुलना करता का? तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले.
मग तुम्ही चम्पी मालिश करण्यासाठी एकत्र आला का?
ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आले आहेत अशी टीका भाजपकडून झाल्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, ठाकरे बंधू जर सत्तेसाठी एकत्र आले, तर मग तुम्ही एकमेकांची चम्पी मालिश करण्यासाठी एकत्र आलात का? अशी विचारणा त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवू नका, असेही ते म्हणाले. मराठी माणसाची संघटना फोडण्याच पाप तुम्ही केलं आहे. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. जागावाटपावरून ते म्हणाले की, राज साहेबांनी आकडा सांगितला नाही, आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणी अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणार्या अन्याया संदर्भात आवाज उठवला नाही. ना या राज्याच्या सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकार्यांनी मराठी माणसावर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं
बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू. मुख्यमंत्र्यांच कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याच ते केलं का? अशी विचारणा त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असत. सत्तेसाठी तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची. मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली तुम्ही हे तुमचं मराठी प्रेम असल्याचे हल्लाबोल त्यांनी केला.